मुख्य सामग्रीवर वगळा

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी व शिलालेख...

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला


आंबिवली बौद्ध लेणी

वाचकमित्रांनो, मी रोहित भोसले माझ्या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत करतो आहे. काल दिनांक ०३ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला भेटीचा योग आला. यापूर्वी दोन वेगवेगळ्या मित्रांसोबत कोथळीगड पाहून झाला आहे. परंतु, जॉनी व अनंता ( जे आजच्या भेटीत सोबत होते ) यांनी कोथळीगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली मग लागलीच आम्ही कोथळीगड भेटीस निघालो.  

कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आंबिवली गावाजवळ आहे. कर्जत स्थानकापासून किल्ल्याच्या पायथ्याचे अंतर हे सुमारे २९ किमी असून तर नेरळपासून २७ किमी इतके आहे. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून कुसुर घाटमार्गाने मालवाहतूक घाटावरच्या गावाशी जोडलेल्या ह्या घाटमार्गाने होत होती. यामुळे, या घाटमार्गावर चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तेवढ्याच बळकट संरक्षक दुर्गांची निर्मिती झाली. त्यातील च एक आकाराने लहान तरीही महत्वपूर्ण असा कोथळीगड उर्फ पेठच्या किल्ल्याची सफर आज आपण करणार आहोत.

पेठचा किल्ला हा आकाराने लहान असला तरीही त्याची माची ही आकाराने खूप मोठी आहे. किल्ला पाहिल्यावर लक्षात येते की, ह्याची निर्मिती ही सातवाहनकाळात झाली असावी यास पुरावा म्हणजे अखंड कातळात खोदून बनवलेला बालेकिल्ल्यावर जाणारा पायरीमार्ग व गडावर असलेल्या कोरीव लेणी व काटकोनात असलेल्या खोदीव पाण्याच्या टाक्यांची मुबलक प्रमाणात आढळून येणारी संख्या होय. संख्या मोजली नाही परंतु; सहज वीस एक पाण्याच्या लहानमोठ्या कातळकोरीव टाक्या सहज असतील. माझे मित्र जॉनी व अनंता ह्यांनी तर उद्गार पण काढले की, केवढ्या पाण्याच्या टाक्या आहेत बापरे... 


स्वराज्यात कोथळीगड किल्ल्याला महत्वाचे स्थान असलेले दिसून येते कारण येथे स्वराज्याचे शास्त्रागार होते. किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे किल्ला चढून आल्यावर सुरुवातीला दोन तोफा दृष्टीस पडतात. इथेच मुख्य सुळक्याला बांधकाम करून पुढील बाजूस बुरुज बांधून काढला आहे. किल्ल्याच्या मुख्य सुळक्याच्या डाव्या बाजूभोवती गडाची तटबंदी व गडाचे दरवाजाचे बांधकामाचे अवशेष दिसून येतात. डाव्या बाजूला सुळक्याचा आतून मुख्य बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दगडी पायरीमार्ग केला असून सुळक्याच्या पोट फाडून कोथळा बाहेर काढून वर जाण्यासाठी केलेल्या पायरीमार्गामुळे तर ह्या किल्ल्याला कोथळीगड नाव पडले नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहात नाही. मुख्य बालेकिल्ल्यावर जाण्यापूर्वी डाव्या बाजूला तीन लेणी कोरीव लेणी दिसून येतात. यातील पहिल्या लेण्यांमध्ये आता स्थानिक बांधवांच्या कालभैरव देवतेचे ठाणे आहे. दुसरी लेणी ही छोटीशी असून तिसरी लेणी ही प्रशस्त स्वरूपाची लेणी असून यामध्ये चार नक्षीदार खांब असून यातील एक खांब क्षतिग्रस्त झालेला आहे. या लेणीमध्ये एक लांबलचक दगडी बाक असून यावर आता पुन्हा एक मुखवटा सदृश दगडी शिल्प ठेवलेले असून मागील वर्षीच्या भेटीमध्ये ते तिथे न्हवते. तिथे असलेल्या आजोबांना यांबद्दल विचारणा केली असता त्यांनी हे काळभैरवाचे ठाणे आहे असे सांगितले. बालेकिल्ला वर दगडी पायरीमार्ग चढून आल्यावर महादरवाजाचे दर्शन होते. एकसंध कातळात कोरून महादरवाजाची निर्मिती झाली आहे. महादरवाजाच्या उजव्या बाजूला भिंतीवर शरभ शिल्प व गजशिल्प दिसून येते. येथे महादरवाजाच्या चौकटीत शिवप्रेमींकडून दरवाजा बसवलेला असून बालेकिल्ल्यावर पाण्याच्या टाक्या व वाढलेल्या झाडी दिसून येतात. या झाडींमध्ये बलेकिल्ल्यावरील वस्तूंचे जोते दिसून येतात. या झाडी साफ केल्यावर कदाचित बालेकिल्ल्यावरील अनेक वास्तू नव्याने उजेडात येतील.


किल्ल्याचा इतिहास :-

शिवकाळात गडाचा वापर हा शस्त्रागार म्हणून केला जात होता. पुढे संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होते, असे सांगितले जाते. या काळात किल्ल्यावर एक रक्तरंजित इतिहास घडला आहे,  असे अभ्यासकांचे मत आहे. गडाचा किल्लेदार नारोजी त्रिंबक हा गडावरील रसद आणण्यासाठी जवळील गावास गेला होता. जाताना त्याने आपला विश्वासू माणकोजी पांढरे यास किल्ल्याची जबाबदारी दिली होती. औरंगजेबाने अब्दुल कादर या सुभेदारास कोथळीगड जिंकून आणण्यासाठी पाठवले. त्यावेळेस शिवकाळात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर हा संभाजी महाराजांच्या काळात औरंजेबास जाऊन मिळाला होता. तो देखील अब्दुल कादर यासोबत पेठ किल्ल्याच्या मोहिमेवर होता. काझी हैदर ने माणकोजी पांढरे यास फितूर केले. माणकोजी पांढरेने फितुरीने मुघलांचे सैन्यास गडावर प्रवेश दिला व यात मराठ्यांचे सैन्य मारले गेले व अशाप्रकारे गड मुघलांच्या ताब्यात गेला.
 
किल्ला पाहून झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या पायथ्यापासून जवळच अंदाजे १.३ किमी अंतरावर असलेली प्राचीन आंबिवली बौद्ध लेणी ला भेट दिली. हे लेणं उल्हास नदीच्या उपनदी असलेली चिल्हार नदीच्या काठावर स्थित असून ही पूर्वाभिमुख असलेली विहार स्वरूपाचे लेणं आहे. लेणीच्या दर्शनी भागात चार खांब असून यातील मधले दोन खांब हे अष्टकोनी असून बाहेरचे दोन खांब हे षोडशकोनी आहेत. खालील बाजूस वेदीकापट्टीचे नक्षीकाम असून मधल्या खांबाच्या खाली द्वारपाल सदृश शिल्प दिसते. लेणीच्या बाहेर असलेल्या खांबावर पाली प्राकृत भाषेतील शिलालेख आहे अशी माहिती मला माहित होती. तर तो कुठे आहे हे पाहण्याची उत्सुकता लागली होती. आंबिवली लेणी मध्ये एकूण पाच शिलालेख आहे (संदर्भ :-  एस. नागाराजू १९८१, पान क्र. ३२९)

शिलालेख क्र.१ 
घ न प र म था  च प क र म था

शिलालेख क्र. २
चे त य व न प रा ? य ? क ह

शिलालेख क्र. ३
जे व सी व

शिलालेख क्र. ४ 
पु स सी व

शिलालेख क्र. ५ 
गी री ?  सु सी व


आत व्हरांड्यात प्रवेश केल्यावर डाव्या व उजव्या बाजूला दगडी बाक असलेला दिसून येतो. आतील बाजूस प्रवेश करण्यास समोर दोन प्रवेशद्वार असलेले दिसून येतात. आतमध्ये प्रशस्त असे सभागृह असून यामध्ये डाव्या - उजव्या व समोरील भिंतींमध्ये प्रत्येकी चार खोल्या असून त्यामध्ये कोणत्याही दगडी बाकाचे बांधणी दिसून येत नाही. या अर्थी हे शून्यागर आहेत.नंतरच्या काळात येथे विविध देवता बसवलेल्या गेलेल्या आहेत. यामध्ये गणपती, लक्ष्मी - विष्णू, राधा - कृष्ण व हनुमान यांच्या मूर्ती सध्या दिसून येतात. सदर आंबिवली बौद्ध लेणी ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खाते, मुंबई मंडळ यांच्या अखत्यारीत आहे. लेणीच्या बाहेर आता मागच्या काही वर्षांमध्ये सदर खात्यामार्फत बांधीव ओट्याचे बांधकाम झालेले असून या लेणीपरिसरात मद्यपान करणे, अतिक्रमण करणे व अश्लिल चाळे करणे हे कायद्याने गुन्हा आहे. तरीही काही मंडळी येथे आजही मद्यपान करताना आढळून येतात. याकडे भारतीय पुरातत्व खाते यांचे दुर्लक्ष झाले आहे, हे खेदाने नमूद करावेसे वाटते.


चित्रदालन :-

गडाच्या दरवाजाची रचना
गडमाथ्यावर असलेल्या तोफा
गडावरील लेणीत असलेले काळभैरवाचे ठाणे
दुसरी लेणी
तिसरी प्रशस्त लेणी
गडावरील पाण्याच्या टाक्या
गडावरील लेणीजवळ निवांत क्षण
गडावरील कातळकोरीव पायऱ्या
गडाचा महादरवाजा
बालेकिल्ल्यावर असलेले एकमेव पाण्याचे खोदीव टाके
आंबिवली लेणी
खांबांवरील शिलालेख






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...