मुख्य सामग्रीवर वगळा

किल्ले गुमतारा - एकांतवासात दिवस कंठत असलेला अल्पपरिचित दुर्ग

काही ठिकाणांनी आपल्या भौगोलिक स्थानामुळे इतिहासात महत्वपूर्ण भूमिका बजावली असतात. पण पुढील काळात वाढत्या आधुनिकीकरण तसेच शहरीकरणामुळे हा इतिहास मागे पडत चालला असताना; ती ठिकाणे मात्र एकांतवासात हरवतात. शोधलीत तर अशी खुप ठिकाणे आपल्या अवतिभोवती दिसून येतील. अशाच अनेक ठिकाणांपैकी एक भिवंडीजवळील किल्ले गुमतारा होय. हरेंद्र मास्तर यांनी सदर किल्ल्याच्या भटकंतीसाठी आदल्या दिवशी विचारणा केली आणि खुप दिवस किल्ले भटकंती केली नसल्याने लागलीच होकार दिला.

गुमतारा किल्ला हा कल्याण येथून ३१ किमी अंतरावर असून, कल्याण येथून भिवंडी - वाडा रोडवर वज्रेश्वरीच्या अलीकडे १० किमी अंतरावर दुगाड फाटा येथून आत दुगाड, मोहीली तसेच घोटेगाव गावाच्या हद्दीत उभा आहे. या किल्ल्याला घोटवड किल्ला, दुगाड किल्ला, गोतारा अशी आणखी काही नावे आहेत. चारही बाजूंनी घनदाट जंगलात उंच टेकडीवर असलेला हा किल्ला चढण्यास मध्यम श्रेणीचा असला तरीही या किल्ल्यावर जाणाऱ्या अनेक पायवाटा - ढोरवाटा हा मार्ग जिकरीचा करतात. जंगलटप्पा पार करून वरील भाग काहीसा निसरडा मुरुमाचा आहे. तेव्हा हा भाग करताना जरा जपून अन्यथा तुमची एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. इथून पुढे डोंगरधारेवरून सरळ निमुळत्या वाटेने वर जात एके ठिकाणी गडाची तटबंदी असलेली दिसून येते. या ठिकाणी तटबंदीचे काही दगड ढासळलेले दिसून येतात. याच मार्गे वर जात आपण गडाच्या मुख्य महादरवाजापाशी येऊन उभे ठाकतो आणि आतापर्यंत केलेल्या कष्टाचे (तंगडतोडीचे) चीज झाल्यासारखं वाटते. महादरवाजा हा गोमुखी बांधणीचा असून दगडी तटबंदीने युक्त असा आहे. महादरवाजाच्या पायथ्याशी मूळ दगडातील पायऱ्या आणि त्यास काहीठिकाणी असलेली एकसंध कातळ भिंत ही सातवाहनकालीन दुर्गरचनेची साक्ष पटवून देते तर नंतर शिवकाळात त्यास दगडी चिऱ्यांची तटबंदी बांधून सदर महादरवाजा भक्कम केलेला दिसतो. महादरवाजा ओलांडून वर आल्यावर समोरच पाण्याचे भग्न टाके दिसून येते. तसेच महाद्वाराच्या बाजूने जाणाऱ्या उजव्या वाटेने समोरील दिशेस पाच पिण्याच्या पाण्याच्या सातवाहनकालीन टाक्या आहेत. महाद्वार तसेच या पाण्याच्या टाक्या येथून मधून जाणाऱ्या वाटेने वर गेल्यावर वाड्यांचे दगडी चौथरे दृष्टीस पडतात. यातील एका ठिकाणी नव्याने बसवलेली गडदेवता असून तिच्या हातात त्रिशूळ व तलवार आहे. तिजशेजारी सतीशिळेचा एक भग्न भाग ठेवलेला आहे. या गडदेवतेच्या स्थानावरून थोडे वरील बाजूस गेल्यावर एक कोरडे पाण्याचे टाके दिसून येते. तसेच येथून वरील वाट ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर असलेल्या बालेकिल्ल्यावर घेऊन जाते.

तर प्राचीनकाळी सोपारा - कल्याण मार्गावर देखरेखीसाठी ह्या किल्ल्याची निर्मिती चौकिवजा केली असावी. मराठ्यांच्या रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार असा हा किल्ला आपली शेवटची घटका मोजत उभा आहे.

टीप:- स्वतःजवळ प्रत्येकी किमान २ लिटर पिण्याचे पाणी बाळगावे.

#सह्याद्री #gumtarafort #trek #trekkingindia #trekking #rohitrbhosale

छायाचित्र :-

१. किल्ले गुमतारा

२.सोबती
३.दिशादर्शक फलक 

४. गडाचा महादरवाजा

५.महादरवाजा (मुख्य प्रवेशद्वार)

६. गोमुखी बांधणीची मुख्य प्रवेशद्वार रचना

७. महादरवाजा तसेच बुरुज व तटबंदी

८. दुर्ग अवशेष नकाशा फलक

९. कातळकोरीव पाण्याचे टाके
१०. गडदेवतेचे ठाणे
११. गडदेवता


किल्ले गुमतारा सफरीचा व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube लिंक :- https://youtu.be/xzpr78D0iOU?si=NMkHcwY1qFN2z4Vc


धन्यवाद 🙏🙏🙏



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी व शिलालेख... किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला आंबिवली बौद्ध लेणी वाचकमित्रांनो, मी रोहित भोसले माझ्या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत करतो आहे. काल दिनांक ०३ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला भेटीचा योग आला. यापूर्वी दोन वेगवेगळ्या मित्रांसोबत कोथळीगड पाहून झाला आहे. परंतु, जॉनी व अनंता ( जे आजच्या भेटीत सोबत होते ) यांनी कोथळीगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली मग लागलीच आम्ही कोथळीगड भेटीस निघालो.   कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आंबिवली गावाजवळ आहे. कर्जत स्थानकापासून किल्ल्याच्या पायथ्याचे अंतर हे सुमारे २९ किमी असून तर नेरळपासून २७ किमी इतके आहे. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून कुसुर घाटमार्गाने मालवाहतूक घाटावरच्या गावाशी जोडलेल्या ह्या घाटमार्गाने होत होती. यामुळे, या घाटमार्गावर चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तेवढ्याच बळकट संरक्षक दुर्गांची निर्मिती झाली. त्यातील च एक आकाराने लहान तरीही महत्वपूर्ण असा कोथळीगड उर्फ पेठच्...

खोपोली येथील KP Waterfall अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा

दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी खोपोली येथील KP WATERFALLS अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा येथे भेट दिली. हा धबधबा मुळात लोणावळा - कल्याण रेल्वे मार्गावरील मुंबई अप viaduct -6 येथे स्थित आहे. याचे स्थान इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वेस्थानक येथे उतरावे लागते. खोपोली रेल्वे स्थानक येथे उतरले असता संपूर्ण बोरघाटाची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. या स्थानकावरून काहीसे पूर्वोत्तर पाहिले असता डोंगरावर एक ब्रीज गेलेला दिसून येतो. हाच आहे तो वर उल्लेख केलेला पुणे - कल्याण रेल्वे Viaduct आणि नेमके येथेच आपल्याला जायचे आहे. या सफरीसाठी मी रोहित रा. भोसले व प्रफुल्ल पुरळकर असेच दोघे होतो. मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावरून पूर्वेला बाहेर पडत आपण झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी रिक्षा करावी किंवा अंतर जवळच असल्याने पायी - पायी पण रमत गमत हे अंतर पार करता येईल. आम्ही खोपोली येथे उतरल्यावर हे अंतर रमत गमत पायी कापायचे असे ठरवले. येथील धबधबे हे केवळ पावसाळी असल्याने या दिवसात या धबधब्याची सफर केलात तेही आठवड्याच्या शनिवार, र...