मुख्य सामग्रीवर वगळा

पेब किल्ला

किल्ले पेब विकटगड
मित्रांनो, आज मी तुम्हाला या ब्लॉग च्या माध्यमातून किल्ले विकटगड अर्थात किल्ले पेब चे दर्शन घडवणार आहे. 
ऐतिहासिक संदर्भ :- किल्ल्यावर असलेल्या गुहेचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी धान्यकोठारासाठी केलेला असा ऐतिहासिक संदर्भ या पेब किल्ल्याबद्दल मिळतो. तर चला माझ्यासोबत या पेब किल्ल्याच्या प्रवासाला...

गडाचे नाव :- किल्ले पेब ( विकटगड )
प्रकार :- गिरिदुर्ग
उंची :- समुद्रसपाटीपासून अंदाजे २१०० फूट
श्रेणी :- मध्यम
पायथ्याचे गाव :- नेरळमार्गे फणसवाडी
जवळचे रेल्वेस्थानक :- मध्यरेल्वेवरील नेरळ रेल्वे स्थानक

प्रवासाचा अनुभव :-
हा ट्रेक आम्ही १७ ऑक्टोबर २०२० मध्ये केला असून नुकतेच कोरोना चे ताळेबंदी शिथिल केली होती व राज्याच्या पर्यटन विभागामार्फत खबरदारीची काळजी घेऊन पर्यटन करण्यास परवानगी देण्यात आली होती. ताळेबंदी काळात आपल्यासारख्या सह्यभटक्यांना घरी बसून अक्षरशः कंटाळा आला होता आणि कधी एकदा सह्याद्रीत मनसोक्त हिंडायला मिळतेय याची उत्सुकता लागली होती. अगदी याच वेळी माझा भटकंती मध्ये सोबत असलेला मित्र वैभव आठवड्यापूर्वी मला संपर्क करून त्याला पेब किल्यावर जाण्याची इच्छा माझ्याकडे बोलून दाखवली आणि मीही क्षणाचाही विलंब न लावता त्याला होकार दर्शवला आणि पेब किल्ल्याच्या भटकंती साठी जाण्याचा निर्णय पक्का केला, मुळात मी पूर्वीच दोनवेळा हा किल्ला पाहून आलो आहे परंतु; वैभव, ऋत्विक आणि कर्तव्य यांना हा किल्ला बघायचा होता. तर आता जायचं तर ठरलं होतं पण अजूनही अत्यावश्यक सेवा वगळून सर्वसामान्य लोकांना लोकलने प्रवासाची मुभा न्हवती मग काय झाली पंचाईत. मग विचार केला खाजगी ट्रॅव्हल्स च्या गाडीने जाऊया. तसा हा विचार खर्चिक होता. कारण; आपण ट्रेकर्स मंडळी बजेट मध्ये ट्रेक करणारे आहोत. पण आता खाजगी गाडीशिवाय काही पर्याय न्हवता आणि असे पण इतक्या महिन्यांच्या ट्रेक चे पैसे बाजूला काढलेलेच होते मग आम्ही एका ओळखीच्या ट्रॅव्हल्स कडून स्विफ्ट डिझायर + ड्रायव्हर अशी गाडी बुक केली. 
आता दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० ला निघायचं होतं आणि ठरल्याप्रमाणे ड्रायव्हर काका माझ्या घराजवळ बरोबर ५.३० ला हजर, मी सुद्धा सर्व तयारी करून त्यांची वाट बघतच होतो.मी निघालो आणि आता डोंबिवली वरून तिघांना पिक अप करायचे होते. ते माझी वाट बघत नाक्यावर थांबलेच होते. एकदाचा मी ते जिथे उभे होते तिथे पोहोचलो आणि आता आमचा प्रवास कल्याण शिळफाटा - कटई नाका - बदलापूर - नेरळ मार्गावर प्रवास सुरु झाला. इतक्यात पहाट होत होती. बदलापूर - कर्जत मार्गावर अक्षरशः धुके पसरले होते. तासाभरात आम्ही माथेरान घाट जिथे चालू होतो तिथे आलो. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची तपासणी चालू होती. आम्ही देखील त्या गोष्टींची पूर्तता करून पुढे घाट मार्गाकडे गाडी वळवली. आजचा पेब (विकटगड) चा ट्रेक माथेरान टॉय ट्रेन मार्गे जाणाऱ्या ठिकाणाहून आम्ही करणार होतो. पेब किल्यावर येण्याच्या तशा खूप वाटा आहेत. जसे की नेरळ मार्गे आनंदवाडी फणसवाडी मार्गे, पनवेल मार्गे माळडुंगे गावातून वर उल्लेख केलेल्या दोन्ही वाटा या दाट जंगलातून जाणाऱ्या असल्याने आणि मी प्रथम ट्रेक ला आलो होतो तेव्हा याच जंगलाच्या मार्गाने आनंदवाडी फणसवाडी च्या मार्गाने किल्ल्यावर आलेलो होतो. सदर रस्ता खूप दमछाक करणारा आहे. तुम्ही जर एकटे येत असाल तर तुमच्यासाठी लेखात पुढील उल्लेख केलेल्या मार्गानेच या असे मी सुचवू इच्छितो.

प्रत्यक्ष किल्ल्यावरील अनुभव :-
वर उल्लेख केलेल्या मार्ग सोडून आम्ही माथेरान घाटमार्गे जाणारा माथेरान रेल्वे ट्रॅक च्या मार्गाने ट्रेक ला सुरुवात केली, माथेरान घाटमार्ग संपूर्ण चढून आल्यावर दस्तुरी नाक्याच्या अलीकडे अवघे पाच मिनिटे आधी  तुम्हाला "कड्यावरचा गणपती" असा फलक लावलेला दिसेल. इथे उतरून माथेरान टॉय ट्रेन च्या मार्गाने सरळ चालत ट्रेक सुरू होतो. आम्ही देखील इथे उतरून ट्रेक ला सुरुवात केली.   वीस एक मिनिटे पुढे आल्यावर  एक वर्तुळाकार कमान दृष्टीस पडते. त्याला एक घंटा सुद्धा बांधलेली आहे. 
नेमके याच  ठिकाणाहून खाली जायचे आहे. खाली उतरत असताना उजवीकडची वाट ही तुम्हाला पेब विकटगड किल्ल्यावर घेऊन जाते तर, डावीकडची वाट तुम्हाला कड्यावरच्या गणपती च्या पायथ्यापाशी घेऊन जाते. आम्ही सर्वप्रथम डावीकडे वळून कड्यावरच्या गणपतीच्या पायथ्यापाशी गेलो नंतर तिथून मागे पुन्हा येऊन उजवीकडची निमुळती वाट धरून पेब किल्ल्याकडे कूच केली. वर्षाऋतु नुकताच संपला असल्याने निसर्गाच्या सौंदर्यात हिरवाईने भर घातली होती याचा प्रत्यय आम्हाला वेळोवेळी त्या निमुळत्या वाटेने किल्ल्याकडे जाताना होत होता.
माथेरान चा सख्खा शेजारी असलेला किल्ले विकटगड गडाच्या मध्यावर असलेल्या पेबी देवीच्या मंदिरावरून गडाला पेब किल्ला असेही संबोधले जाते. पाच मिनिटे चालल्यानंतर एक लोखंडी जिना लागला, या जिन्याच्या आधारे खाली उतरून पुन्हा दहा मिनिटे आम्ही या निमुळत्या वाटेने आता माथेरान आणि पेब किल्याच्या बेचक्यात येऊन थांबलो इथून जो पेब किल्याच्या दर्शनी भाग बघून आम्ही मंत्रमुग्ध झालो आणि आम्हाला फोटो काढायचा मोह आवरला नाही. आम्ही सर्वांनी फोटो काढून आता पेब किल्याच्या दिशेने कूच केली तीच निमुळत्या वाटेने किल्याच्या उजच्या बाजूने जाणारी वाट आम्हाला आता लोखंडी जिन्यापाशी येऊन थांबली. इथे तुम्हाला पेब विकटगड किल्याचा सुचनाफलक आढळून येईल. या लोखंडी जिन्याच्या आधारे आम्ही गडमाथ्यावर प्रवेश केला. जिना चढून वर आल्यावर दोन पायवाट लागतात, उजवीकडची पायवाट आम्हाला गडाच्या मध्यावर असलेल्या पेब देवीच्या मंदिरापाशी घेऊन गेली आणि या मंदिरापाशी आम्हाला पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याचे टाके दिसून आले. नुकताच पावसाळा संपला असल्याकारणाने सदर टाक्यांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता. मंदिराला भेट देऊन आम्ही आल्यामार्गे परत मागे येऊन जिथून लोखंडी जिना वर चढून आलो तिथे आलो व डावीकडची चढणीची वाट चढून गडाच्या पठारावर येऊन पोहोचलो. इथून पुन्हा दोन पायवाटा आहे. माथेरान च्या डोंगराला नजरेसमोर ठेऊन जी पायवाट जाते ती माथेरान वरून दिसणाऱ्या किल्ल्याच्या बुरुजावर घेऊन जाते. बुरुजावरून हिरवाईने नटलेला माथेरान चा अजस्त्र डोंगर आम्हाला मंत्रमुग्ध करत होता. बुरुजावरून मागे फिरून आम्ही परत पठारावरून स्वामी समर्थांच्या मठाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने वर चढून किल्ल्याच्या अतिउच्च अशा ठिकाणी येऊन ठेपलो. या ठिकाणी येताना सुद्धा तुम्हाला  लोखंडी जिना लागेल तो जरा काळजीपूर्वक चढुनच वर चढावे. या ठिकाणी असलेल्या मंदिरात आणि तुम्हाला दत्तगुरूंची मूर्ती तसेच पादुका दिसून येईल. 
पेब किल्ल्यावरून माथेरान चा भलामोठा डोंगर तर दिसतोच त्याबरोबर प्रबळगड, कलावंतीण , इर्शाळगड, मोरबे धरण, चंदेरी - म्हैसमाळ, गाडेश्वर तलाव, पनवेल इथपर्यंत चा प्रदेश दृष्टीच्या टप्प्यात येतो.
आम्ही आमच्या सोबत आणलेल्या खाऊचा फडशा पाडुन जरा विश्रांती करून आज आलेला अनुभव नजरेत, मनात आणि आपापल्या मोबाईल मध्ये साठवून परतीच्या प्रवासाला लागलो.☺️

मुंबईपासून जवळच असलेल्या माथेरान डोंगररांगेतील एक ऐतिहासिक किल्ला असलेला पेब विकटगड तुमच्या लिस्ट मध्ये जरूर ठेवा.


धन्यवाद.....



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी व शिलालेख... किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला आंबिवली बौद्ध लेणी वाचकमित्रांनो, मी रोहित भोसले माझ्या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत करतो आहे. काल दिनांक ०३ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला भेटीचा योग आला. यापूर्वी दोन वेगवेगळ्या मित्रांसोबत कोथळीगड पाहून झाला आहे. परंतु, जॉनी व अनंता ( जे आजच्या भेटीत सोबत होते ) यांनी कोथळीगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली मग लागलीच आम्ही कोथळीगड भेटीस निघालो.   कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आंबिवली गावाजवळ आहे. कर्जत स्थानकापासून किल्ल्याच्या पायथ्याचे अंतर हे सुमारे २९ किमी असून तर नेरळपासून २७ किमी इतके आहे. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून कुसुर घाटमार्गाने मालवाहतूक घाटावरच्या गावाशी जोडलेल्या ह्या घाटमार्गाने होत होती. यामुळे, या घाटमार्गावर चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तेवढ्याच बळकट संरक्षक दुर्गांची निर्मिती झाली. त्यातील च एक आकाराने लहान तरीही महत्वपूर्ण असा कोथळीगड उर्फ पेठच्...

खोपोली येथील KP Waterfall अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा

दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी खोपोली येथील KP WATERFALLS अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा येथे भेट दिली. हा धबधबा मुळात लोणावळा - कल्याण रेल्वे मार्गावरील मुंबई अप viaduct -6 येथे स्थित आहे. याचे स्थान इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वेस्थानक येथे उतरावे लागते. खोपोली रेल्वे स्थानक येथे उतरले असता संपूर्ण बोरघाटाची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. या स्थानकावरून काहीसे पूर्वोत्तर पाहिले असता डोंगरावर एक ब्रीज गेलेला दिसून येतो. हाच आहे तो वर उल्लेख केलेला पुणे - कल्याण रेल्वे Viaduct आणि नेमके येथेच आपल्याला जायचे आहे. या सफरीसाठी मी रोहित रा. भोसले व प्रफुल्ल पुरळकर असेच दोघे होतो. मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावरून पूर्वेला बाहेर पडत आपण झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी रिक्षा करावी किंवा अंतर जवळच असल्याने पायी - पायी पण रमत गमत हे अंतर पार करता येईल. आम्ही खोपोली येथे उतरल्यावर हे अंतर रमत गमत पायी कापायचे असे ठरवले. येथील धबधबे हे केवळ पावसाळी असल्याने या दिवसात या धबधब्याची सफर केलात तेही आठवड्याच्या शनिवार, र...