मुख्य सामग्रीवर वगळा

मावळातील पाटण लेणी - एक विलक्षण सुंदर अनुभव

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यापाठोपाठ कदाचित मावळ तालुक्यातील डोंगरकपारीत सर्वाधिक लेण्या असाव्यात... नव्हे त्या आहेच. मावळ मध्ये काही सुप्रसिद्ध, तर काही अल्पपरिचित तर काही अजूनही अपरिचित अशा लेण्या आहेत. त्यामध्ये; कामशेत जवळची बेडसे लेणी, मळवली जवळील भाजे गावातील भाजे लेणी, पाटण गावातील भातराशी शिखराच्या पोटातील पाटण चा लेणी समूह, दुर्तगती महामार्गाच्या पलीकडे कार्ले बौद्ध लेणी, घोरावडेश्वर लेणी, पाल, उकसन लेणी यांसारख्या परिचित व काही अजूनही पर्यटक अभ्यासकांच्या नजरेतून दूर असलेल्या असंख्य लेण्या आहेत. यापैकी, पाटण गावाच्या डोंगराच्या मागे भातराशी शिखराच्या पोटातील पाटण लेणीची सफर व माहिती जाऊन घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

तुम्ही जर मुंबईहुन रेल्वेने येणार असाल तर लोणावळा या स्थानकावर उतरावे. लोणावळ्याच्या पुढे पुणे येथे जाणाऱ्या लोकल असून ( ठराविक अंतराने) या लोकलद्वारे लोणावळ्याच्या पुढील मळवली या स्थानकावर उतरावे. स्थानकाच्या फलाट क्रमांक २ च्या दिशेने बाहेर आल्यावर मुंबई- पुणे दुर्तगती महामार्गावरून जाणारा ब्रिज उतरून डाव्या बाजूला जाणारा रस्ता हा पाटण गावाकडे जातो तर उजवीकडे भाजे लेणी, लोहगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे.

तसेच तुम्ही जर स्वतःच्या खाजगी वाहनाने येत असाल तर जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरून कार्ले येथून मळवली साठी ( मुंबईकडून उजव्या बाजूला- पुणे येथून डाव्या बाजूला ) फाटा फुटतो. तिथून वळण घेऊन तुम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे मळवली स्थानक ओलांडून पाटण अथवा भाजे गावासाठी जाऊ शकता. पाटण गाव हे अश्व नालाकृती डोंगराच्या खाली वसलेले आहे. त्याच्या एका दिशेला विसापूर व दुसऱ्या बाजूला भातराशी शिखर आहे. या डोंगराच्या संपूर्ण डोंगरात लेण्या सदृश कपार असलेल्या दिसून येतात. यातील पाटण लेणी समूहात आतापर्यंत चार लेण्या सर्वांसमोर आलेल्या आहेत.

आजची सफरीवर मी व सुरज जगताप सर असे दोघे जणच होतो. आम्ही आमचा प्रवास ठाण्याहून सकाळी सात वाजता इंटरसिटी एक्सप्रेस ने लोणावळ्याच्या दिशेने सुरू केला. आम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर आमची भेट भाजे गावातील आयु. विकास भालेराव सरांशी झाली. ते सुद्धा ड्युटीवरून घरी निघाले होते. लोणावळ्याला उतरल्यावर त्यांनी आम्हाला नाश्ता करायला घेऊन गेले. निघण्यापूर्वी लोणावळा स्थानकावर आमची भेट आमचे मित्र आयु. मिलिंद साळवे सरांशी झाली. मस्त इडली, मेदूवडा व चहा असा नाश्ता करून आम्हाला सरांनी त्यांच्या गाडीने पाटण गावापर्यंत आणून सोडले त्याबद्दल आम्ही सरांना धन्यवाद देऊन त्यांचा निरोप घेतला. पाटण गावात आल्यावर सर्वप्रथम उजव्या बाजूला विसापूर किल्ल्याची तटबंदी व बुरुज लक्ष वेधून घेतात. तसेच डाव्या बाजूला एक उंच शिखर दृष्टीस पडतो, ते शिखर म्हणजेच भातराशी शिखर होय. नुकत्याच होऊन गेलेल्या गुढीपाडवा मुळे गावातील घरांच्या समोर अजूनही गुढी आकाशाला गवसणी घालताना दिसत होत्या.
तेवढ्यात गेल्या वर्षी वर्षावासाच्या प्रारंभी गुरुपौर्णिमेच्या दिनी आम्ही इथे येऊन गेलो होतो. परंतू, मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता आणि विसापूर किल्ल्याच्या तटाबुरुजावरून मोठमोठे अक्राळविक्राळ धबधबे जणू कोसळत नव्हे तर आदळत होते. यामुळे; गेल्यावर्षी आम्ही आल्या पावली माघारी फिरावे लागले होते. हे गतवर्षीची आठवण काढत काढत आम्ही पाटण गावातून सरळ चालत गाव ओलांडून पुढे वाघजाई मंदिराजवळ आम्ही कधी येऊन पोहोचलो हे कळलं देखील नाही. मागील वर्षीच्या धुवांधार पावसामुळे आम्ही या मंदिराच्या इथूनच परतीचा मार्ग धरला होता. असो... वाघजाई मंदिराच्या आवारात विविध समाधी अवशेष, काही शिल्प, गद्देगळ दिसून येतात. त्याचप्रमाणे, मंदिराकडे तोंड करून असलेले आठ नंदी यांचे दगडी शिल्पसुद्धा विशेष उल्लेखनीय आहे.
मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या वाटेने सरळ (डाव्या हाताला शेताच्या बांधावर जायला काही पायऱ्या केल्या आहेत ते न ओलांडता) पुढे जाऊन आता आम्ही लेणीकडे जाणारी वाट शोधत - शोधत समोरील डोंगरात असलेल्या धबधब्याचा प्रवाह उजवीकडे ठेऊन पाहिले असता डावीकडे पंचशील ध्वज फडकत असलेला आमच्या दृष्टीस पडला. तसेच, पाटण बौद्ध लेणीकडे असा आशयाचा एक दिशादर्शक फलक देखील लावलेला आमच्या दृष्टीस पडला. इथून मळलेली पायवाट रमत - गमत तुडवत अवघ्या काही वेळेतच आम्ही लेणीकडे येऊन पोहोचलो. लेणीकडे पोहोचल्यावर एक विलक्षण असा जगात पोहोचलो की काय असा अनुभव आला. तिथली शांतता... मंद वारा... पक्ष्यांचा किलबिलाट आणि लेणीच्या समोर दिसणारे आल्हाददायक सह्याद्रीच रूपडं... आता फक्त त्यांच्या प्रेमात पडायचंच बाकी होतं. पावसाळ्यातील येथील निसर्गसौंदर्य काही औरच असते. परंतु, या कडाक्याच्या उन्हात देखील हा संपूर्ण प्रदेश व लेणी यांच्या तुम्ही प्रेमात नाही पडलात तर नवलच... 
पाटण च्या सद्यस्थितीत माहिती असलेल्या लेणीसमूहातील आम्ही क्रमांक एक च्या लेण्याकडे उभे होतो. हे लेणे म्हणजे एक चैत्यगृह स्वरूपातील असून गजपृष्ठाकर छत असलेल्या या लेणीमध्ये उजव्या बाजूला एक चौकोनी आकाराच्या रचनेमध्ये मध्यभागी अंदाजे आठ ते नऊ फूट उंचीचा स्तूप असलेला दिसून येतो. हा स्तूप पूर्णाकृती असून जोते, मेधी, वेदिकापट्टी, अंड व हर्मिका असा संपूर्ण परिपूर्ण आहे. याची हर्मिका ही छताला टेकलेली असून स्तुपाभोवती प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा आहे. तसेच स्तूपाच्या बाहेर चौकटीला कधी काळी द्वाररचना असावी, याचे रचनासुद्धा दिसून येते. तसेच त्या दरवाजाची खोबणी दृष्टीस पडतात. स्तूपाच्या जवळ एक मूळ दगडातील आसन असलेले दिसून येते. याव्यतिरिक्त अंडाकृती रचना असलेल्या या चैत्यगृहाच्या शेजारी एक पाण्याचे टाके असलेले दिसून येते. हे पाण्याचे टाक्याच्या समोरील भाग नव्याने बांधून संवर्धित करण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे, पावसाळ्यात नैसर्गिकरित्या येथे पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठा हातभार लागला आहे. ही लेणी प्रारंभीच्या काळातील म्हणजेच थेरवाद कालखंडातील असल्यामुळे येथे पूर्णाकृती स्तूप सोडला तर इतर कोणतेही रचना, शिल्प दिसून येत नाही. तसेच पाटण लेणीच्या या चैत्यगृहामध्ये कोणताही शिलालेख नाही.

लेणीतुन समोर कार्ले लेणीचा डोंगर दृष्टीस पडतो. तसेच समोरून जाणारा मुंबई- पुणे दुर्तगती महामार्ग समोर दिसतो. नुकत्याच होऊन गेलेल्या गुढीपाडवा सणामुळे पाटण गावातील प्रत्येकाच्या घरासमोर उभारलेल्या रंगीबेरंगी गुढ्या डोकावत होत्या. या चैत्यगृह लेणीच्या जराश्या डाव्या बाजूला डोंगरात एक अर्धवट स्तुप व विहार असलेली लेणी दृष्टीस पडत होती. असा हा सारा परिसर न्याहाळत थोडा वेळ लेणीचे निरीक्षण करून थोडे छायाचित्रे काढून आम्ही पाटण लेणीसमूहातील क्रमांक एक च्या लेणीचा निरोप घेतला तो मुळातच पाटण लेणीसमूहातील क्रमांक दोन च्या लेणीकडे मार्गक्रमण करण्यासाठी...

पाटण गावातील ही लेणी कार्ले - भाजे लेणीच्या उपग्रहातील लेणी असून येथील परिसर शांत व रम्य आहे. ही जागा त्या काळी लेणी बांधण्यासाठी का निवडली असेल ते मला लेण्यात गेल्यानंतर कळले. येथून दिसणारे निसर्ग सौंदर्य नुसते डोळ्यात साठवत बसावे असेच आहे. येथील शांतता मनाला भावते. पक्ष्यांचा किलबिलाट, मंद गार वारा, सारे कसे अगदी मनाला स्पर्शून जात होतं. आमचा पाय काही केल्या लेण्यातून निघत न्हवता. कधीकाळी येथील आसमंतात बुद्धं सरणं गच्छामि चा घोष दुमदुमला असेल. हे सर्व डोळ्यासमोर आणता, अंगावर शहारा येत होता. तेव्हा येथील वातावरण एका वेगळ्या चैतन्याने भारलेले असेल यात मला काही शंका वाटत नाही.

टीप :-

१. पाटण लेणी ही विसापूर किल्ला व भातराशी शिखराच्या पोटात असल्याने पर्जन्यकाळात अतिवृष्टी मुळे या किल्ल्यावरून मोठ्या प्रमाणात धबधबा वाहत असतात. त्यामुळे ओढे, नाले आपली पातळीच्या वर भरलेले असतात. त्यामुळे, पाटण लेणीला मुसळधार पावसात भेट देणे शक्यतो टाळा.

२.  पाटण लेणीच्या आवारात कोणत्याही प्रकारचे मद्यपान - धूम्रपान करू नये.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी व शिलालेख... किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला आंबिवली बौद्ध लेणी वाचकमित्रांनो, मी रोहित भोसले माझ्या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत करतो आहे. काल दिनांक ०३ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला भेटीचा योग आला. यापूर्वी दोन वेगवेगळ्या मित्रांसोबत कोथळीगड पाहून झाला आहे. परंतु, जॉनी व अनंता ( जे आजच्या भेटीत सोबत होते ) यांनी कोथळीगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली मग लागलीच आम्ही कोथळीगड भेटीस निघालो.   कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आंबिवली गावाजवळ आहे. कर्जत स्थानकापासून किल्ल्याच्या पायथ्याचे अंतर हे सुमारे २९ किमी असून तर नेरळपासून २७ किमी इतके आहे. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून कुसुर घाटमार्गाने मालवाहतूक घाटावरच्या गावाशी जोडलेल्या ह्या घाटमार्गाने होत होती. यामुळे, या घाटमार्गावर चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तेवढ्याच बळकट संरक्षक दुर्गांची निर्मिती झाली. त्यातील च एक आकाराने लहान तरीही महत्वपूर्ण असा कोथळीगड उर्फ पेठच्...

खोपोली येथील KP Waterfall अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा

दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी खोपोली येथील KP WATERFALLS अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा येथे भेट दिली. हा धबधबा मुळात लोणावळा - कल्याण रेल्वे मार्गावरील मुंबई अप viaduct -6 येथे स्थित आहे. याचे स्थान इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वेस्थानक येथे उतरावे लागते. खोपोली रेल्वे स्थानक येथे उतरले असता संपूर्ण बोरघाटाची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. या स्थानकावरून काहीसे पूर्वोत्तर पाहिले असता डोंगरावर एक ब्रीज गेलेला दिसून येतो. हाच आहे तो वर उल्लेख केलेला पुणे - कल्याण रेल्वे Viaduct आणि नेमके येथेच आपल्याला जायचे आहे. या सफरीसाठी मी रोहित रा. भोसले व प्रफुल्ल पुरळकर असेच दोघे होतो. मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावरून पूर्वेला बाहेर पडत आपण झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी रिक्षा करावी किंवा अंतर जवळच असल्याने पायी - पायी पण रमत गमत हे अंतर पार करता येईल. आम्ही खोपोली येथे उतरल्यावर हे अंतर रमत गमत पायी कापायचे असे ठरवले. येथील धबधबे हे केवळ पावसाळी असल्याने या दिवसात या धबधब्याची सफर केलात तेही आठवड्याच्या शनिवार, र...