सोपारा हे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात स्थित आहे. ज्यास आज नालासोपारा असेसुद्धा ओळखले जाते. नालासोपारा हे मुंबईच्या जवळ असलेले एक वेगाने विकसित होणारे उपनगर असले, तरी या सोपाऱ्याचा प्राचीन इतिहास अत्यंत समृद्ध आहे. आज आपण सोपारा आणि येथील प्राचीन स्तूपाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी, आपण सोपाराच्या प्राचीन इतिहासावर एक संक्षिप्त दृष्टिक्षेप टाकूया. ज्या काळात मुंबई हे लहान-लहान बेटांमध्ये विभागलेले होते, त्या काळात सोपारा हे एक अत्यंत समृद्ध शहर तथा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक महत्त्वाचे बंदरही होते. येथून अरब, ग्रीक, रोम, मेसोपोटेमिया आणि आफ्रिकन देशांशी व्यापार केला जात असे. इसवी सन १५० मध्ये, ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ टॉलेमी याने आपल्या 'जिओग्राफी' (Geography) या ग्रंथात सोपारा हे नवसारी आणि चौल यांच्या दरम्यान वसलेले असल्याचे नमूद केले आहे. तसेच, पहिल्या शतकात रचलेल्या 'पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' (Periplus of the Erythraean Sea) या ग्रंथात सोपारा हे ठिकाण भृगुकच्छ (सध्याचे भरूच) आणि कल्याण यांच्या दरम्यान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, सोपाराचा प्राचीन उल्लेख अवदान ग्रंथांपैकी एक ' दिव्यावदान ' मध्येही आढळतो. या ग्रंथात दानाशी संबंधित ३८ कथांचा समावेश आहे. यातील दुसऱ्या क्रमांकाची जी कथा आहे—ज्यामध्ये भंते पूर्ण (किंवा धम्मप्रभास) यांचे चित्रण आहे—ती कथा तुम्ही अजिंठा लेण्यांमधील लेणे क्रमांक १० च्या प्रवेशद्वाराजवळ पाहू शकता. प्राचीन सिलोन (सिरी लंका) येथे लिहिलेल्या 'महावंश' या ग्रंथात असा उल्लेख आढळतो की, विजय नावाचा एक राजा सोपारा (सोपारक) बंदरातून ताम्रपर्णी (सध्याचे श्रीलंका) देशाकडे रवाना झाला होता. विजय हा श्रीलंकेचा पहिला राजा म्हणून ओळखला जातो. सम्राट अशोकाच्या विशाल साम्राज्यातील एक प्रांत म्हणूनही सोपाऱ्याचे स्थान महत्त्वाचे होते. सम्राट अशोकाच्या एकूण १४ शिलालेखांपैकी, आठव्या आणि नवव्या क्रमांकाचे शिलालेख सोपारा येथेच आढळून आल्या आहेत. त्यापैकी; केवळ ९ व्या क्रमांकाचा शिलालेख सद्यस्थितीत उपलब्ध असून तो मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय येथे प्रदर्शनार्थ ठेवला आहे. त्या शिलालेखाची माहितीपर पोस्टची लिंक या पोस्टच्या खाली दिलेली असून ती माहिती देखील नक्की वाचा. हा स्तूप सध्या ' भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागा ' च्या (Archaeological Survey of India) अखत्यारीत आहे. त्यांच्याच देखरेखीखाली या स्तूपाचे सुशोभीकरणाचे काम सध्या संथगतीने का होईना पण सुरू आहे. ६ मे १९५५ रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या स्तूपाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शनपर भाषण केले होते. सोपारा बौद्ध स्तूप हे मुंबईपासून जवळच असलेल्या या ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध प्रदेशातील २५०० वर्षे जुने वारसा स्थळ आहे.
क्रमशः
©✍️ रोहित रा. भोसले (अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीकृत अपरान्त संगिती विशेषांकासाठी मजतर्फे लिहिलेल्या 'अपरान्ताचे लेणे…' या लेखातील एक परिच्छेद)
#rohitrbhosale #soparastupa #soparaedict
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा