'वीरगळ' म्हणजे युद्धात किंवा कोणत्याही संग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या शूर योद्धेय सैनिकाच्या स्मरणार्थ उभारलेला कोरीव दगडी पाषाणस्तंभ होय. यावर, सहसा वीर पुरुषाची आकृती, त्यांची शस्त्रे, आणि कधीकधी त्यांना स्वर्गात नेणारे अप्सरा किंवा देवदूत यांचे शिल्पांकन असते. कानडी भाषेत ' कल्लू ' म्हणजे दगड ' वीरकल्लू ' म्हणजे वीराचा दगड यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द या वीर योद्ध्यांच्या स्मरणार्थ शिळेला प्रचलित झाला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. थोडक्यात वीरगळमध्ये युद्धात धारातीर्थी पडलेल्या पुरुषाचे स्मरण असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सहसा देवळांजवळ किंवा शेतात आढळणारे हे या स्मारकशिळा इतिहासाच्या मूक साक्षीदार आहेत, विरगळाच्या निर्मितीकाळाचा उगम साधारणपणे शिलाहार काळापर्यंत मागे जातो. महाराष्ट्रातही शिवकाळापूर्वी आणि काळातील अनेक गावांत हे वीरगळ गावाचे रक्षण करताना प्राण अर्पण केलेल्या योद्ध्यांची आठवण म्हणून उभे आहेत. हे केवळ मूक दगड नसून ते तत्कालीन युद्धकला, शस्त्रे, पोषाख आणि तत्कालीन सामाजिक जीवनाची माहिती देतात. गावागावांत शेंदूर फासून पूजले जाणारे हे वीरगळ पाषाण महाराष्ट्राच्या पराक्रमी परंपरेचे प्रतीक आहेत. तर कर्नाटकातील अशीच एक सुंदर 'वीरगळ' (वीरस्मारक शिळा) आपल्या भेटीला आणली आहे. ज्यात एका योद्ध्याच्या शौर्यपूर्ण मृत्यूचे स्मरण करून दिले आहे, ज्याने स्वतःला वीरगती प्राप्त होण्यापूर्वी अनेक शत्रूंना कंठस्नान घातले होते.
सदर वीरगळ ही सद्यस्थितीत मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय येथे प्रदर्शनार्थ ठेवली आहे. या वीरगळीचा कालखंड हा शक १२०४ अर्थात ई.स. १२८२ असा असून, यावर कन्नड भाषा व लिपीमध्ये शिलालेख नमूद आहे. उपरोक्त शिलालेखात असे नमूद केले आहे की, "सोगलाकडे जाणाऱ्या मार्गावर तीस व्यक्तींविरुद्ध लढलेल्या एका युद्धात तीन जणांना ठार केल्यानंतर, बसवय्या-नायक हे 'पंचलिंगा'च्या सान्निध्यात चिरविश्रांती घेत आहेत. या शिलालेखातील दिवंगत वीर असलेले बसवय्या-नायक यांचा उल्लेख 'रायराजगुरू मंडलाचार्य समयचक्रवर्ती ईशान्यादावरू' यांच्या घराण्यातील सदस्य म्हणून करण्यात आला आहे."
✍️ रोहित राजेंद्र भोसले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा