मुख्य सामग्रीवर वगळा

देवलोळी बदलापूर येथील १७ व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण अशी शिवकालीन चावीच्या आकाराची विहीर

तर २३ तारखेला हरेंद्र कांबळे यांचा फोन आला की; उद्या कुठे आहे म्हणून...? मी देखील उत्तरलो, काही ठरलं नाही आहे. तर ते मला म्हणाले जाऊया का उद्या बदलापूर ला एके ठिकाणी आणि मी लागलीच होकार दिला. तर ते ठिकाण होते, बदलापूर येथील देवलोळी गावात असलेली चावीच्या आकाराची विहीर अथवा बारव चे...

दिनांक २४ जून ला ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता आम्ही दोघे बदलापूर कडे निघालो. घरून निघतो न निघतोच जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाचा आनंद घेत आमचा प्रवास दुचाकीवरून बदलापूर कडे सुरू होता. तासाभरात आम्ही बदलापूर पश्चिमेला बदलापूर गावाच्या पुढे अंदाजे ४.५ किमी अंतरावर असलेल्या देवलोळी गावात येऊन पोहोचलो होतो. याच गावात आहे ही मध्युगीन काळातील ऐतिहासिक बारव. आम्ही जेव्हा गावात पोहोचलो तेव्हा पाऊस हलकासा रिमझिम बरसत होता. आता आम्ही विहिरीकडे येऊन उभे ठाकलो होतो. मध्ययुगीन कालखंडातील अंदाजे १७ व्या शतकातील ही विहीर बदलापूर चे ऐतिहासिकृष्ट्या महत्व अधोरेखित करत येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटक अथवा इतिहास प्रेमींना दर्शन देत आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. या विहिरीच्या बांधणीचा कालखंड आणि त्यासंबंधीचा इतिहास समजण्यापूर्वी या विहिरीचे (बारव) आकारमान जाणून घेऊया.

विहिरीचे प्रथमदर्शनी दृश्य


दगडी चिऱ्यांची योग्य ती सांगड घालून बांधलेल्या या विहिरीचे वैशिष्ट्ये म्हणजे लांबून पाहिले असता सदर विहीर शिवपिंडीप्रमाणे भासते. तर आकाशातून पाहिले असता कुलुपाला असलेल्या चावीच्या खाचेप्रमाणे तर समोरून पाहिले असता चावीप्रमाणे दिसते म्हणून हिला चावीच्या आकाराची विहीर असे म्हंटले जाते. ही विहीर अथवा बारव दक्षिणोत्तर अशी असून उत्तरेला मुख्य विहिरीचा गोलाकार भाग असून त्यापुढे; दक्षिणेकडे निमुळता होत जाणारा भाग आहे. दक्षिणेकडून या विहिरीत उतरायला अंदाजे १५ पायऱ्या आहेत. विहिरीचे दक्षिणोत्तर एकूण लांबी सुमारे ४० फूट इतकी असून रुंदी ही 8 फूट इतकी आहे. विहिरीची अंदाजे खोली ३५ फूट इतकी आहे. ११ पायऱ्या उतरून आल्यावर विहिरीत पूर्व - पश्चिम असे दोन कोनाडे अर्थात देवड्या दिसतात. या देवड्यांच्या वर मध्यभागी तीन पानांचे नक्षीकाम केलेले दिसून येते. या देवड्यांचे प्रयोजन रात्रीच्या वेळेस दिवे लावण्यासाठी असावे अशी शक्यता आहे. इथून पायऱ्या उतरत असता आपले लक्ष विहिरीच्या वरच्या दिशेला असलेल्या एका भागाकडे जाते. मुख्य विहिरीच्या गोलाकार भागात द्वारपट्टी च्या वर एका भागात मध्यभागी गणेश मूर्ती तसेच गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन मूर्ती दिसून येतात. गणेशाच्या मूर्तीच्या शेजारी असलेल्या दोन मूर्ती कोणाच्या हे काही सांगता येत नाही. परंतु; उजव्या बाजूच्या मूर्तीच्या हातात ढाल तलवार अशी आयुधे असून डाव्या बाजूच्या मूर्तीचे हात तुटलेले आहे. यावरून ह्या मुर्त्या एखाद्या विरपुरूषाच्या असाव्यात असा अंदाज लावता येतो. त्यावरती दोन दिशेला दोन सिंहमुख शिल्प दिसून येते. ह्या गणेश शिल्प असलेल्या बाजूच्या दोन भिंतीवर शरभ शिल्प दिसून येतात. या दोन्ही शरभ शिल्पांचे मुख भग्न झालेले असल्याने केवळ धडाचा भाग शिल्लक आहे. त्या गणेश शिल्पाच्या खाली मुख्य विहिरीचा दरवाजाला अर्धकमान असून त्यावर दोन्ही बाजूला फुलांचे नक्षीकाम असलेले दिसून येते. या विहिरीला बारमाही पाणी असते. आम्ही पाहायला गेलो तेव्हा तर या वर्षीच्या पावसाची सुरुवात होती तरीही विहिरीत बऱ्यापैकी पाणी होते. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यावर विहिरीतील पाणी वर पायऱ्यांपर्यंत येते. ही विहीर नंदा बारव प्रकारातील आहे. नंदा बारव प्रकारातील विहिरीला एक प्रवेशद्वार असते व तीन टप्प्यात बांधकाम असते. देवलोळी गावातील ही विहीरदेखील पायऱ्या - प्रवेशद्वार - मुख्य विहीर असे तीन टप्प्यात बांधली असल्याने ही नंदा बारव प्रकारातील मोडते. बारव यांचे विविध प्रकार समजून घेत असताना माझे मित्र आदरणीय महेश शिरसाठ सर यांची मोलाची मदत झाली.

दगडी चिर्यात बांधलेल्या विहिरीत उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या


☝️पूर्व पश्चिम अशा दोन देवड्या👇


गणेश तसेच वीर पुरुषांचे शिल्प व शरभ शिल्प

मुख्य विहिरीच्या मुखाशी असलेली अर्धकमान
 
विहीर आणि मी
विहिरीसंबंधी थोडक्यात इतिहास

शिवकालीन म्हणजेच अंदाजे १७ व्या शतकात बांधलेली ही विहीर येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटक व इतिहास प्रेमी नागरिकांना अजूनही आपला इतिहास सांगत दिमाखात दर्शन देत उभी आहे. तर मुंबई - ठाण्यापासून जवळच असलेल्या मध्यरेल्वेच्या बदलापूर स्थानक पश्चिमेला बदलापूर गावाच्या पुढे देवलोळी गावात असलेल्या या ऐतिहसिकदृष्ट्या महत्वाच्या वारसाला नक्की भेट द्या. तसेच ही बारव ज्यांच्यासोबत पाहिली त्या हरेंद्र कांबळे यांचेदेखील खुप खुप आभार.

सह्याद्री वेडे ट्रेकर हरेंद्र मंगल मोहन व मी



धन्यवाद... 🙏


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...