मुख्य सामग्रीवर वगळा

तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र...

तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र...

थेरवाद परंपरेत बुद्धांना धम्मकाया (प्रतिकांच्या) स्वरूपात पुजले जात होते. बुद्धांचा सिंहनाद (धम्मचक्र प्रवर्तन ) निनादल्यापासून बुद्धांची मूर्ती मानवीय स्वरूपात प्रत्यक्षात येईपर्यंत सुमारे ५०० ते ५५० वर्षांचा काळ लोटला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रत्यक्ष प्रतिमेच्या स्वरूपापेक्षा बुद्धांचे प्रतिनिधीत्व दर्शविण्यासाठी प्रतीकांचा शोध सुरू झाला.साहजिकच बुद्धांच्या जीवनाशी संबंधित वस्तू अथवा घटनांचे स्मरण देणाऱ्या वस्तू प्रतीके म्हणून स्वीकारली गेली. यांमध्ये स्तूप, पांढरा हत्ती, कमळ, घोडा, बोधिवृक्ष, गंधकुटी, वज्रासन, धम्मचक्र, बुद्धपाद (पदचिन्ह) व त्रिरत्न ई. होय. तर वरील सर्व धम्मकाया प्रतीकांपैकी तथागथांचे भिक्षापात्र याविषयी माहिती जाणून घेऊया.
आजच्या बिहार राज्यातील गंगा नदीच्या उत्तरेस वसाढ नावाचे खेडे म्हणजेच प्राचीन काळाची राजनगरी वैशाली होय.सध्याचे बिहारमधील वसाढ हेच प्राचीन काळातील वैशाली हे भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक अलेक्झांडर कनिंगहम यांनी प्रथमतः सर्वांसमक्ष आणले. तथागतांच्या हयातीत वैशालीस लिच्छवी राजघराणे राज्य करत होते. वैशाली सोडताना परिनिर्वाणाचा काळ जवळ आल्याने आपण एकटे असावे असे तथागतांना वाटले. त्याचप्रमाणे, वैशालीच्या लिच्छवीना बुद्धांचा जास्तीत जास्त सहवास मिळावा या हेतूने वैशालीचा निरोप घेताना ते बुद्धांच्या मागे बरेच अंतर चालून गेले. आपल्याविषयी असलेल्या आदरयुक्त भावनेच्या जाणिवेपोटी तथागतांनी आपले भिक्षापात्र लिच्छवीना भेट म्हणून दिले.ते भिक्षापात्र लिच्छवीनीं प्राणपणाने जपून ठेवले. वैशालीजवळ एका स्तंभावर ही सत्यकथा लिहून ठेवली आहे, असे वर्णन फाह्यान याने आपल्या प्रवासवर्णनात A Record of Buddhist Kingdoms (Foguo Ji) प्रवासवर्णनात लिहून ठेवली आहे.

सम्राट अशोक यांच्या काळात बुद्धधातू अवशेषांचे लहान लहान भाग करून ते कुपीत भरून सर्व जम्बुद्विपात ८४००० स्तूप उभारले असे सांगितले जाते, परंतु; बुद्धांच्या भिक्षापात्राचे त्या धातूअवशेषांबरोबर भाग केल्याचे कोठेही नोंद नाही. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या भिक्षापात्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. बुद्धांचे भिक्षापात्र कशाचे बनले होते याचा उल्लेख कुठे मिळत नसला तरीही बुद्धांची साधी राहणी लक्षात घेता ते मातीचे अथवा दगडाचे असावे. याला दुजोरा देण्यासाठी सोपारा स्तूपाच्या उत्त्खननातून भेटलेल्या भिक्षापात्राचे अवशेषांची मदत होते. याच सोपाऱ्यात सम्राट अशोकाच्या आठव्या व नवव्या राजाज्ञा सापडल्या. इ.स. १८८२ मध्ये, पंडित भगवनलाल इंद्रजी यांनी तत्कालीन ठाण्याचे कलेक्टर म्युलॉक यांच्या मदतीने सोपारा स्तूपाचे उत्खनन केले. उत्खननात सोपारा येथे ८२ मीटर परिघाचा उत्कृष्ट मातीच्या विटांनी बांधलेला स्तूप आढळून आला. 

सोपारा स्तुपाच्या मध्यभागी एक दगडी करंडक आढळून आला. त्या दगडी करंडकात एक तांब्याचा करंडक होता. त्यात सात मानुषी बुद्धांच्या व एक मैत्रेय बोधिसत्वाची मूर्ती होती. तांब्याच्या करंडकाच्या आत एक चांदीचा करंडक होता. त्यात काही सुवर्णफुले व रत्ने होती. तांब्याच्या करंडकात तांब्याच्या पत्रावर बुद्धांचा छाप व चांदीचे नाणे होते. ते यज्ञश्री सातकर्णी चे नाणे होय. चांदीच्या करंडकात संगमरवरी, त्यात स्फटिक त्यात सुवर्ण करंडक असे विविध सुवर्ण फुले व रत्नाने भरपूर असे करंडक होते. यापैकी, सुवर्णाच्या करंडकात मातीच्या भिक्षापात्राचे लहान तुकडे आणि त्या भिक्षापात्राला अर्पण केलेली दहा सुवर्ण फुले, एक हिरा, एक पाचू होता. सिद्धार्थ गौतमास बुद्धत्व प्राप्त झाल्यापासून, सम्यक संबुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडात तथागतांनी एकच भिक्षापात्र वापरले असणे शक्य नाही. त्या काळात त्यांनी वापरलेल्या अनेक भिक्षापात्रांपैकी कोना एकाचे अवशेष सोपारा स्तुपात जतन करून ठेवले असण्याची शक्यता आहे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे तथागतांच्या महापरिनर्वाणानंतर त्यांचे भिक्षापात्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते त्याचेच शिल्पांकन खालील चित्रात दर्शविले आहे. हे शिल्पाचे अंकन अमरावती स्तूपावर केलेले असून सद्यस्थितीत हे शिल्प गव्हर्नमेंट म्युझियम, चेन्नई येथे सुरक्षित आहे.

✍️ रोहित रा. भोसले.

#rohitrbhosale
#चला_समजून_घेऊ_शिल्पांची_भाषा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...