मुख्य सामग्रीवर वगळा

कोंढाणे लेणी - कर्जत चा प्राचीन इतिहास सांगणारी ऐतिहासिक वास्तू

मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा सह्याद्रीने वेढलेला आहे. ह्या कर्जत मध्ये विविध गडकिल्ले, प्रेक्षणीय स्थळे आहेत. यांपैकी, कर्जत च्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूंपैकी सुमारे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील एक वास्तू म्हणजे किल्ले राजमाचीच्या पायथ्याशी असलेली कोंढाणे लेणी होय. कोंढाणे लेणी हि इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात कोरलेली असून ती बौद्ध धम्मातील स्थविरवाद या पंथाशी संबंधित असलेले शैलगृह आहे. ही लेणी मुंबईपासून पुण्याकडे जाणाऱ्या प्राचीन बोरघाट मार्गावर आहे. सोपारा बंदरातून कल्याणमार्गे पुढे देशावर विविध घाटमार्गाच्या साहाय्याने व्यापार होत असे. या व्यापारावर अंमल अथवा चौकी पहाऱ्यांचे ठिकाण म्हणून किल्ल्यांची निर्मिती झाली. तर अशाच प्राचीन बोरघाट (खंडाळा) मार्गावर किल्ले राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या कोंढाणे लेणीची सफर आपण आज करणार आहोत.
कोंढाणे लेणी तशी आजच्या तारखेपर्यंत मी ४ ते ५ वेळा पहिली आहे. परंतु; मी जेव्हा पहिल्या वेळेस कोंढाणे लेणी ला भेट देण्यासाठी गेलो तेव्हा मी कसा गेलो ? लेणीवर काय पाहिलं ? लेणीची सद्यपरिस्थिती तसेच लेणीसंबंधीचा इतिहास मी या ब्लॉग मध्ये आपल्यासमोर कथन करणार आहे. तुम्ही देखील कोंढाणे लेणीला भेट देणार असाल तर ही माहिती निश्चित च तुम्हाला उपयोगी पडू शकते. वाचून झाल्यावर कोंढाणे लेणीचा हा ब्लॉग कसा वाटला हे मला ब्लॉगच्या शेवटी कमेंट करून नक्की सांगा. तर चला मी सुरुवात करतो.
पहिल्यांदा जेव्हा कोंढाणे लेणी ला भेट दिली तेव्हा मी आणि माझा मित्र जॉनी आम्ही दोघे जण सकाळी ७ वाजता मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावर उतरलो. कोंढाणे लेणी ला जायचे असेल तर तुम्हालादेखील कर्जत स्थानकावर उतरावे लागेल. कर्जत स्थानकाच्या पश्चिम दिशेला उतरून येथून १० मिनिटे चालत आम्ही श्रीराम ब्रिज येथे आलो. येथून शेयरिंग टॅक्सी (रु. २०/३० प्रत्येकी) ने आम्ही कोंडीवडे या गावापर्यंत आलो. कर्जत स्थानक ते कोंडीवडे गाव अंतर सुमारे १४ किमी आहे. इथून पुढे उल्हास नदीपात्र च्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने आम्ही कोंढाणे गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. १५ मिनिटे चालल्यावर आम्ही कोंढाणे गावात आलो. २० -३० घरांचे कोंढाणे गाव मागे सोडून लगेचच आम्हाला कोंढाणे लेणीचा फलक दृष्टीस पडला. कोंढाणे लेणीचा खरा ट्रेक अथवा प्रवास इथून सुरू होणार होता. आम्ही थोड्या वेळ आजूबाजूचे निसर्गसौंदर्य व खंडाळा घाटाचे दृश्य नजरेत व कॅमेरात साठवत लेणीकडे मार्गक्रमण केले.आता येथून जंगलातून ट्रेक करत जावे लागते. 
कर्जतमार्गे कोंढाणे - राजमाची असा देखील ट्रेक करता येतो. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य काही औरच असते. अंदाजे ३० मिनिटे ट्रेक केल्यावर आपण एका धबधब्याजवळ येऊन पोहोचतो. पावसाळा दिवसात या येथील धबधब्याचा जलप्रपात ओसंडून वाहत असतो. इथे थोडी विश्रांती केली व पुढे निघालो. लेणीच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर विविध लेणी संवर्धक संस्था यांनी दिशादर्शक फलक लावले असून वाट चुकण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आता आम्ही धबधब्याच्या ठिकाणाहून १० मिनिटे पुढे आल्यावर कोंढाणे लेणी कडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या दृष्टीस पडल्या. संपूर्ण पायऱ्या वर चढून जात नाही तोपर्यंत संपूर्ण लेणी दृष्टीस पडत नाही. आता आम्ही दगडी पायऱ्या चढून वर आलो आणि भव्य असे कातळशिल्प आमच्या समोर होते आणि लेणी पाहताक्षणीच माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले.... अप्रतिम ! कातळात शिल्प कोरणाऱ्या हातांनी जे काही कोरलं आहे त्याला तोड नाही.

वर सांगितल्याप्रमाणे कोंढाणे लेणी हे बौद्ध धम्मातील स्थविरवाद (थेरवाद) पंथाशी निगडित असून या मध्ये एक चैत्यगृह व इतर असलेले सात विहार व पानपोढी ( पाण्याचे टाके ) असे या लेणीचे स्वरूप आहे. कोंढाणे लेणीमध्ये आम्ही काय काय पाहिलं त्या प्रत्येक लेणीची  थोडक्यात माहिती मी खाली वर्णन करतो.

मुख्य चैत्यगृह :-

ट्रेक करून आम्ही दगडी पायऱ्या चढून वर आल्यावर प्रथमतः आम्हाला पिंपळपानी कमान असलेले एक मोठे लेणे दृष्टीस पडले, हे लेणं म्हणजे चैत्यगृह असे होय. हे चैत्यगृह मोठे असून दर्शनी भागात पिंपळपानी कमान असून त्याला लाकडी तुळया दिसून येतात. ह्या लाकडी तुळया सुमारे २२०० ते २३०० वर्षे जुने म्हणजेच ह्या लेणीच्या निर्मितीकाळापासून अजूनही तशाच आहेत असे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. चैत्यगृहाचा छताचा आकार हा गजपृष्ठाकार असून छताला पूर्वी लाकडी तुळया असू शकतात त्याच्या खुणा आपण छताला पाहू शकतो. हे चैत्यगृह मूळ दगडी खांबांवर तोलून धरलेले होते त्यांची संख्या सुमारे २८ अशी होती. परंतु; कालौघात अथवा आक्रमणात ते नष्ट झाले असावे अशी शक्यता आहे. हे खांब अष्टकोनी आकाराचे होते व लेणीमध्ये असलेले अष्टकोणी खांब बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचे प्रतिनिधित्व करतात. भारतीय पुरातत्व खाते यांच्या मार्फत येथे नव्याने बांधलेले १२ खांब सध्या येथे दिसून येतात. 

चैत्यगृहाच्या मध्यभागी भलामोठा स्तूप असून तो सध्या भग्न स्थितीत असलेला दिसून येतो. नैसर्गिक अथवा अनैसर्गिक तत्वांद्वारे या स्तुपाची ही स्थिती झाली असावी. या स्तुपाचे संवर्धन व त्याचे पुनर्बांधणी करणे खूप आवश्यक आहे. जेव्हा बुद्धांना मानवी आकृतीमध्ये शिल्प घडवले गेले न्हवते म्हणजेच, स्थविरवाद (थेरवाद) परंपरेत बुद्धांना वंदन करण्यासाठी काही प्रतीकांचा वापर होत असे. त्यांपैकी महत्वाचे प्रतीक म्हणजे स्तूप होय. या स्तुपाला वंदन करण्यासाठी चैत्यगृहात खांबांच्या मागून परिक्रमा पथ दिसून येतो. या पथावरून परिक्रमा करून बुद्धरुप असलेल्या स्तुपाला वंदन करण्याचा प्रघात होता.
मुख्य चैत्यगृहाच्या बाहेर डाव्या बाजूला एक भग्न झालेली परंतु थोडं शिराचा भाग शाबूत असलेली मानवी शिल्प नजरेस पडते. येथे कधीकाळी पूर्णकृती शिल्प असावे. त्या शिल्पाकडे पाहात असताना उजवीकडे आपल्यांना एक शिलालेख दृष्टीस पडतो. पाली प्राकृत भाषेत असलेला व धम्मलिपीत  "कण्हस अंतेवासिना बलकेंन कत" असे वर्णन असलेला शिलालेख दिसून येतो. कन्हाचा शिष्य बलक (बालुक) याने हे कोरलेलं आहे असे यातून प्रतीत होते.

महाविहार :-

मुख्य चैत्यगृहाला लागून एक महाविहार आहे. या महाविहारात स्थविर, महस्थाविर यांना राहण्यासाठीच्या खोल्या दिसून येतात. या खोल्यांत दगडी आसनव्यवस्था असलेली दिसून येते. त्याचप्रमाणे, प्रत्येक खोलीच्या दरवाजावर पिंपळपानी चैत्यकमान कोरलेली दिसून येते.
हे महाविहार दगडी खांबानी तोलून धरले होते असा आभास निर्माण करण्यासाठी येथे मूळ दगडी खांब होते. परंतू; ते सुद्धा काळाच्या ओघात भग्न झाले आहेत. पण त्यांच्या खुणा छताला अजूनही दिसून येतात. 
महाविहाराच्या छताला बारकाईने बघितल्यास आम्हाला तिथे पूर्वी चित्रे काढलेली असू शकतात असे वाटले. कदाचित तिथे अजिंठ्याच्या धर्तीवर छताला रंगीत चित्रे रंगवली गेली असतील ही. परंतू; नंतरच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात जाळ पेटवला गेला असून शकतो. किंवा येथील वरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यामुळे दगडात वर्षानुवर्षे पाणी झिरपून येथील खडक मृदू होऊन येथील चित्रे नष्ट झाली असावी असा अंदाज बांधता येतो. 
महाविहाराच्या व्हरांड्यात भिंतीवर अर्धउठावातील स्तूप कोरलेला असून अजूनही त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे असून हे शिल्प अजूनही शाबूत असलेले दिसून येतात. मुख्य चैत्यगृहातील स्तुपाची प्रतिकृती ह्या शिल्पाला म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. मुख्य चैत्यगृहातील स्तूप कसा असेल हे या स्तूपाच्या प्रतिकृतीकडे पाहून कळण्यास एखाद्या लेणीला भेट देण्यास आलेल्या पर्यटक अथवा अभ्यासकास मदत होते. व्हरांड्यातील छताला रंगीत चित्रे असल्याचे पुरावे येथील व्हरांड्यात दिसून येतात. रंगकामाचे पुसटसे पुरावे येथे दिसून येतात.

विहार:- 
महाविहाराच्या शेजारी विहार असून येथे देखील येथे वर्षावसाच्या काळात वास्तव्यास असलेल्या भिक्खूसंघाना राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था दिसून येते. परंतु; येथून या लेणीसमूहातील पुढील सर्व विहारे नष्ट झालेली दिसून येतात. परंतु; काळाची साक्ष देत ते अजूनही आपल्या संरक्षण व संवर्धनाची हाक देत अजूनही उभे आहेत.

पानपोढी :-

या लेणीसमूहात विहाराच्या शेवटी पाण्याची टाके असलेले दिसून येतात. याच टाक्यातून रोजच्या वापरासाठी पाण्याचा उपयोग करून घेतला जात असावा.


अशाप्रकारे, कोंढाणे लेणी ही मुंबई - पुणे पासून एका दिवसात पाहून होईल असे प्राचीन बौद्ध लेणी समूह असून या ठिकाणाला नक्की भेट द्या. कोंढाणे लेणीची माहिती कशी वाटली हे मला जरूर कळवा.

कोंढाणे लेणीचा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला असून खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तो नक्की पहा.



टिप्पण्या

  1. छान आशी माहीती दिली सर हे वाचून माझे मन भरून आले व कधी लेणी पाहण्यास जावे आसे वाटू लागले आशीच माहीती देत राहा सर
    धन्यवाद साधू साधू साधू 🌹🙏

    उत्तर द्याहटवा
  2. रोहितसर, खूप छान, ऊपयुक्त माहिती दिली आहे. प्रत्येक ठिकाणाची माहिती छायाचित्रांच्या सहीत दिल्याने लेणीचा मार्ग,शिल्प, वास्तू,लेख समजायला सोपे जाते. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान नमो बुध्दाय जय भीम

    उत्तर द्याहटवा
  4. छान मार्गदर्शक माहिती दिली आहे, उत्कृष्ट

    उत्तर द्याहटवा
  5. Nice, Quick, Fast and easy to know information. Thanks for the needful explanation.

    उत्तर द्याहटवा
  6. छाया चित्रासह प्रस्तुत केलेला कोंढाणे लेणीचा क्षणों क्षणी उंचावत जाणारा आलेख जिज्ञासुंना लाख मोलाचं मार्गदर्शन करुन देतो.नेहमी खुप छान उपयुक्त अशी माहिती दिली.मनापासुन धन्यवाद 💐🍰

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी व शिलालेख... किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला आंबिवली बौद्ध लेणी वाचकमित्रांनो, मी रोहित भोसले माझ्या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत करतो आहे. काल दिनांक ०३ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला भेटीचा योग आला. यापूर्वी दोन वेगवेगळ्या मित्रांसोबत कोथळीगड पाहून झाला आहे. परंतु, जॉनी व अनंता ( जे आजच्या भेटीत सोबत होते ) यांनी कोथळीगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली मग लागलीच आम्ही कोथळीगड भेटीस निघालो.   कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आंबिवली गावाजवळ आहे. कर्जत स्थानकापासून किल्ल्याच्या पायथ्याचे अंतर हे सुमारे २९ किमी असून तर नेरळपासून २७ किमी इतके आहे. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून कुसुर घाटमार्गाने मालवाहतूक घाटावरच्या गावाशी जोडलेल्या ह्या घाटमार्गाने होत होती. यामुळे, या घाटमार्गावर चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तेवढ्याच बळकट संरक्षक दुर्गांची निर्मिती झाली. त्यातील च एक आकाराने लहान तरीही महत्वपूर्ण असा कोथळीगड उर्फ पेठच्...

खोपोली येथील KP Waterfall अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा

दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी खोपोली येथील KP WATERFALLS अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा येथे भेट दिली. हा धबधबा मुळात लोणावळा - कल्याण रेल्वे मार्गावरील मुंबई अप viaduct -6 येथे स्थित आहे. याचे स्थान इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वेस्थानक येथे उतरावे लागते. खोपोली रेल्वे स्थानक येथे उतरले असता संपूर्ण बोरघाटाची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. या स्थानकावरून काहीसे पूर्वोत्तर पाहिले असता डोंगरावर एक ब्रीज गेलेला दिसून येतो. हाच आहे तो वर उल्लेख केलेला पुणे - कल्याण रेल्वे Viaduct आणि नेमके येथेच आपल्याला जायचे आहे. या सफरीसाठी मी रोहित रा. भोसले व प्रफुल्ल पुरळकर असेच दोघे होतो. मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावरून पूर्वेला बाहेर पडत आपण झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी रिक्षा करावी किंवा अंतर जवळच असल्याने पायी - पायी पण रमत गमत हे अंतर पार करता येईल. आम्ही खोपोली येथे उतरल्यावर हे अंतर रमत गमत पायी कापायचे असे ठरवले. येथील धबधबे हे केवळ पावसाळी असल्याने या दिवसात या धबधब्याची सफर केलात तेही आठवड्याच्या शनिवार, र...