मुख्य सामग्रीवर वगळा

शिवनेरी बौद्ध लेणी - जुन्नर




प्रस्तावना:-

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. अभ्यासकांच्या मते संपूर्ण भारत भर सुमारे १२०० नोंद लेणी असून त्यामधील सुमारे ९०० ते १००० लेण्या ह्या एकट्या महाराष्ट्रात आहे. या इतक्या मोठ्या प्रमाणावर लेणी इथे महाराष्ट्रात कोरल्या गेल्या, काय कारण असेल बरे ? पुढे जाऊन अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, भारताच्या लिखित इतिहासाची सुरुवातच मुळात बौद्ध सम्राट अशोकांच्या शिलाशासनापासून होते, असे अभ्यासक अथवा पुरातत्व शास्त्राद्वारे मानले जाते. बिहार येथील बाराबार डोंगररांगेत आजीवक साठी पहिली लेणी कोरली. श्रमण परंपरेतील चारिका करणाऱ्या भिक्खुंसाठी वर्षावासात निवासासाठी लेण्यांची निर्मिती ही मुळात सम्राट अशोकांच्या काळात सुरू झाली.

पुढे जाऊन बौद्धधम्म/ मताचा प्रचार व प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर आदरणीय भिक्खूगण विंध्य-नर्मदा पार करून ह्या महाराष्ट्रात उतरले. सह्याद्रीतील कातळकडे बघून त्यांच्या मनात अक्षरशः धुमारे फुटले असतील. दक्खनच्या पठारावरील अग्निजन्य (बेसाल्ट) खडक हा लेनिनिर्मितीसाठी अनुकूल असा होता. तर केवळ अग्निजन्य खडक असून लेणी निर्मिती शक्य होती का ?? तर याचे उत्तर नाही असे आहे. आज आपण भल्यामोठ्या लेणींचे समूह पाहतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर या दक्खनच्या पठारावर लेणी कोरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ असणे आवश्यक होते, हे प्रथमदर्शी लक्षात येते. 

तर या कार्याला कोणी हातभार लावला असेल ? कोणा शासकाचे आर्थिक पाठबळ या लेणीनिर्मितीसाठी मिळाले असेल ? इतक्या मोठ्या प्रमाणावर लेण्या महाराष्ट्रात लेण्या कोरल्या गेल्या आहेत, याचा अर्थ ज्यांच्या पाठिंबा ह्या लेणीनिर्मितीस होता ते राजे अथवा त्यांची राजवट ही स्थैर्य व एकहाती सत्ता असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात लेणीनिर्मिती शक्य नाही, हे अभ्यासातून लक्षात येते. तर कोण होते हे शासक ? तर ते होते महाराष्ट्रातील आद्य राजवंश ज्यांची ख्याती आहे. ते सातवाहन राजे.  इ. स. पूर्व २३० ते इ.स. २२० असे तब्बल ४५० वर्षे या महाराष्ट्र भूमीवर ज्यांनी राज्य गाजवले असे महाराष्ट्रातील आद्य राजे सातवाहन यांमध्ये एकूण ३० राजे होऊन गेले. या सातवाहन यांचा मूळ पुरुष सिमुक सातवाहन होते. या घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हे पराक्रमी राजे होते. यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात लेणी खोदल्या गेल्या.  त्याचबरोबर वाशिष्ठीपुत्र पुळूमावी, यज्ञश्री सातकर्णी यांचे देखील दान शिलालेख आपणास लेणी शिलालेखात आढळून येतात. त्याचबरोबर, सातवाहन राजांचे राजकीय शत्रू असलेले क्षत्रप राजांनी देखील बौद्ध धम्माच्या प्रचार - प्रसारासाठी लेणी निर्मितीसाठी दान दिलेले आहे हे लेणींमध्ये असलेल्या दान शिलालेखावरून स्पष्ट होते. त्याचबरोबर व्यापारी, वयक्तिक व्यक्तींनी सुद्धा दानातून लेणीनिर्मितीसाठी हातभार लावला आहे असे अभ्यासाअंती दिसून येते.

किल्ले शिवनेरी


विषयप्रवेश:-

तर जुन्नर ही प्राचीन काळात सातवाहनांची आर्थिक राजधानीचे शहर होते. येथून जवळ असलेल्या नाणेघाट व तेथील जकात नाका म्हणून तेथे ठेवलेला दगडी रांजण त्याची साक्ष देत अजूनही उभे आहे. या बौद्ध राजे सातवाहनांच्या काळात जुन्नर येथे महाराष्ट्रातील ९०० ते १००० लेण्यांपैकी सुमारे २२५ नोंद (गॅझेटनुसार) बौद्ध लेणी ह्या एकट्या जुन्नर मध्ये आहे. अभ्यासकांच्या अंदाजाप्रमाणे हा आकडा सुमारे ३०० ते ३५० इतका असण्याची शक्यता आहे. या लेण्यांपैकी जुन्नर मधील शिवनेरी बौद्ध लेणीसमूहाची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

जुन्नर येथे चौकात असलेला छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

गॅझेट मधील नोंदीनुसार शिवनेरी बौद्ध लेणी समूहात ८४ लेण्या असून ह्या लेण्या शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर शहरात असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या मध्यावर पूर्व, पश्चिम व दक्षिणाभिमुख अशा स्थित आहे. जुन्नर (गाव) शहरातून शिवनेरी किल्ल्याकडे जाताना या लेण्या दृष्टीस पडतात. साखळदंडच्या मार्गाने या लेण्यांपर्यंत जाता येते. या मार्गे एकूण ५५ लेण्या असून यांपैकी काही लेण्यांपर्यंत जाण्याचा मार्ग हा पूर्णपणे तुटलेला असून येथे जाता येत नाही. 

या भागातील लेणीसमूहात (लेणी क्रमांक ४८) एक वैशिष्टयपूर्ण चैत्यगृह आढळून येते चैत्यगृहाच्या दर्शनी भागाच्या छताला रंगकाम केल्याचे दिसून येथे. यास प्रवेशद्वाराला पायऱ्या केलेल्या असून पायऱ्यांजवळ दगडी बाक असून प्रशस्त असे प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस भल्यामोठ्या खिडक्या असे बाहेरील बाजूस स्वरूप दिसून येते. आत प्रवेश केल्यावर खाली कुंभ त्यावर अष्टकोनी खांब व त्यावर उलटा कुंभ अशी रचना असलेले दोन पूर्णाकृती व दोन अर्धाकृती भिंतीत असलेले खांब दृष्टीस पडतात. ह्या चैत्यगृह चौरस आकारात असून मागील भिंतीपासून थोडा पुढे पण मध्यभागी एक पूर्णाकृती स्तूप दिसून येतो. हा स्तूप घडीव प्रकारातील स्तूप असून अखंड कातळात खोदलेला असून त्याची हर्मिका व छत्रावली ह्या अजूनही सुस्थितीत असलेल्या दिसून येतात. या चैत्यगृहाच्या बाहेरील उजव्या भिंतीवर विरसेन नावाच्या गृहपती ज्याने लोकांच्या कल्याणासाठी व सुखासाठी चैत्यगृहाचे दान दिले आहे असा आशयाचा दान शिलालेख दिसून येतो. त्याचबरोबर, येथील लेणी समूहात असलेल्या दोन पाणपोढी असून त्यावर पहिल्या पोढी वर गता (ग्रीक) देशाचा इरील याने तसेच दुसऱ्या पोढीवर गिरीभूती व त्याची पत्नी शिवपालनिका यांनी येथील विहार तसेच पाण्याच्या टाक्यांचे दान असे दान शिलालेख दिसून येतात. लेणी क्रमांक ४२ हे या समूहातील सर्वात मोठे विहार स्वरूपाचे लेणे असून त्यात १२ खोल्या (शून्यागर)  आहेत. 

त्याचप्रमाणे, लेणी क्रमांक ३६ मध्ये छोटी ओसरी असलेलं लेणं असून यामध्ये डाव्या भिंतीवर अर्धउठावातील खंडित स्तूप असून त्याच्या बाजूला भिंतीवर ५ ओळींमध्ये भलामोठा शिलालेख कोरलेला दिसून येतो. पतिबधक गिरीभूती जो अपगुरिय व सवगुरिय यांचा पुत्र आहे. त्याने हे लेणं व टाक्यांचा दान शिलालेख आहे.

ही लेणीसफर मी व प्रफुल्ल पुरळकर सर यांनी नियोजित केली होती. पुढे या सफरीला वकील. खंडेश बगाटे सर मिळाले. पुढे मी जुन्नर येथे हजर राहणार आहे असे जेव्हा विजय दिपके सरांना कळले तेव्हा ते लागलीच आपल्या सहकारी मित्रासमवेत चाकण वरून जुन्नर ला येऊन मिळाले. तसेच इतक्या दिवस ज्यांना फेसबुक वरून पाहत होतो, ते डॉ. मारुती ढवळे सर (MBBS) व त्यांच्या सुविद्य पत्नी मंदाकिनी ढवळे मॅडम यांची शिवनेरी लेणी वर भेट झाली.


चित्र यादी :-

चैत्यगृहाचा दर्शनी भाग

शिवनेरी किल्ल्यावर जाणाऱ्या साखळदंडाच्या मार्गाने लागणाऱ्या कातळकोरीव पायऱ्या
चैत्यगृहातील स्तूप व कुंभयुक्त अष्टकोनी खांब
पूर्णाकृती स्तूप
चैत्यगृहाच्या आतील भागात छताला असलेले रंगकामाचे अवशेष
चैत्यगृहाच्या बाहेरील भागात छताला असलेले रंगकामाचे अवशेष
१२ खोल्या असलेले महाविहार
भिंतीत कोरलेला अर्धउठावातील स्तूप व विहार
शिलालेख








टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी व शिलालेख... किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला आंबिवली बौद्ध लेणी वाचकमित्रांनो, मी रोहित भोसले माझ्या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत करतो आहे. काल दिनांक ०३ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला भेटीचा योग आला. यापूर्वी दोन वेगवेगळ्या मित्रांसोबत कोथळीगड पाहून झाला आहे. परंतु, जॉनी व अनंता ( जे आजच्या भेटीत सोबत होते ) यांनी कोथळीगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली मग लागलीच आम्ही कोथळीगड भेटीस निघालो.   कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आंबिवली गावाजवळ आहे. कर्जत स्थानकापासून किल्ल्याच्या पायथ्याचे अंतर हे सुमारे २९ किमी असून तर नेरळपासून २७ किमी इतके आहे. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून कुसुर घाटमार्गाने मालवाहतूक घाटावरच्या गावाशी जोडलेल्या ह्या घाटमार्गाने होत होती. यामुळे, या घाटमार्गावर चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तेवढ्याच बळकट संरक्षक दुर्गांची निर्मिती झाली. त्यातील च एक आकाराने लहान तरीही महत्वपूर्ण असा कोथळीगड उर्फ पेठच्...

खोपोली येथील KP Waterfall अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा

दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी खोपोली येथील KP WATERFALLS अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा येथे भेट दिली. हा धबधबा मुळात लोणावळा - कल्याण रेल्वे मार्गावरील मुंबई अप viaduct -6 येथे स्थित आहे. याचे स्थान इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वेस्थानक येथे उतरावे लागते. खोपोली रेल्वे स्थानक येथे उतरले असता संपूर्ण बोरघाटाची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. या स्थानकावरून काहीसे पूर्वोत्तर पाहिले असता डोंगरावर एक ब्रीज गेलेला दिसून येतो. हाच आहे तो वर उल्लेख केलेला पुणे - कल्याण रेल्वे Viaduct आणि नेमके येथेच आपल्याला जायचे आहे. या सफरीसाठी मी रोहित रा. भोसले व प्रफुल्ल पुरळकर असेच दोघे होतो. मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावरून पूर्वेला बाहेर पडत आपण झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी रिक्षा करावी किंवा अंतर जवळच असल्याने पायी - पायी पण रमत गमत हे अंतर पार करता येईल. आम्ही खोपोली येथे उतरल्यावर हे अंतर रमत गमत पायी कापायचे असे ठरवले. येथील धबधबे हे केवळ पावसाळी असल्याने या दिवसात या धबधब्याची सफर केलात तेही आठवड्याच्या शनिवार, र...