मुख्य सामग्रीवर वगळा

Hal Khurd Caves | दुर्लक्षित हाळ खुर्द लेणी, खोपोली

हाळखुर्द बौद्ध लेणी


सर्वप्रथम मी या पोस्ट च्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की; जे - जे प्रसिद्ध आहे; त्या वास्तू अथवा ठिकाणांना भेटी देण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. त्या स्थळांना वारंवार भेटी दिल्या जातात. परंतु; काही ठेवा असा देखील आहे, जो वर्षानुवर्षे आपल्या अस्तित्वाची लढाई या निसर्ग चक्रात एकटाच लढतो आहे. ऊन, वारा, पावसाच्या माऱ्यात शतकानुशतके कोणा वाटसरू अथवा पामराची वाट पाहत तिष्ठत उभा आहे. आपल्या मनीच्या गतकालीन वैभवाच्या गोष्टी ऐकण्यास जणू काही कोण तरी येईल आणि त्यास मी खुल्या मनाने, ओतप्रोत माहितीचा खजिना रिता करेन.... ! हेच तर त्या वास्तु बोलत नसतील ना ?? कधी हाकली आहे का त्यांची हाक ?? कधी साधला आहे का त्यांच्याशी संवाद ??.... मी ऐकलं आहे आज अशाच एका प्राचीन वास्तूची कथा...आज आम्ही इतकी माणसे त्या वास्तूवर एकत्र बघून ती वास्तू किती सुखावली असेल म्हणून सांगू...?मी तरी आज त्या वास्तूवर, तिच्या मनीच्या गुजगोष्टी ऐकून भारावलो. तिच्याशी मनातल्या मनात संवाद साधू लागलो. त्या वास्तूला एकेक प्रश्न विचारू लागलो, आणि ती वास्तूदेखील माझ्याशी बोलू लागली. तिच्या प्राचीन वैभवाची गौरवगाथा माझ्यापाशी मांडू लागली. तर तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली येथील हाळखुर्द येथील दुर्लक्षित लेणीला आज भेट दिली. दुर्लक्षित याचसाठी उल्लेख करतोय कारण; आजही ही लेणी पर्यटक, अभ्यासक व संवर्धकांच्या नजरेपासून दूरच राहिली आहे. काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अभ्यासक, संवर्धक तथा स्थानिक लोक या लेणीला भेट देत असतील. तर अशाच दुर्लक्षित प्राचीन वारशास भेट देण्यासाठी सध्या भटकंती सुरू आहे. ही प्राचीन ठेवा असलेल्या वास्तूची ओढ आज आम्हाला घेऊन आली आहे. दुर्लक्षित अशा हाळखुर्द बौद्ध लेणीवर.....

ही लेणी जुन्या मुंबई पुणे दुर्तगती मार्गावर खोपोलीजवळ हाळखुर्द या गावाच्या मागे असणाऱ्या डोंगरात आहे. हाळ गावात प्रवेश केल्यास सरळ आल्यास बौद्ध वाडा च्या मागून जाण्यास येथे मार्ग आहे. सहा भिक्खूनिवास असलेले हे लेणं स्थविरवाद (थेरवाद) कालखंडातील विहार स्वरूपातील लेणी असून, शेजारी पाण्याचे कोरीव टाके आहे. परंतु; सद्यस्थितीत टाक्यांमध्ये तडा गेला असल्यामुळे गळती लागली असून यात पाणी साठुन राहात नाही. विहार स्वरूप लेण्यांमध्ये समोर दोन खोल्या तसेच डाव्या व उजव्या बाजूला दोन खोल्या असलेल्या दिसून येतात. प्राचीन काळी साष्टी बेटाजवळील पनवेल तसेच उरण बंदरावरून प्राचीन बोरघाट मार्गावर असलेली ही लेणी, तिच्या भरभराटीच्या कालखंडात कित्येक वाटसरू अथवा पांथस्थांची सदधम्माच्या सावलीत त्यांची सोबत करत असेल, त्यांना आसरा देत असेल नाही... ?

तर अशी होती आजची दुर्लक्षित वारसा सफर...

कसे जाल ? 

मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावर उतरून बाहेर मुख्य रस्त्यावर आल्यावर हाळ या गावी जाणाऱ्या ऑटो किंवा खोपोली बस थांबा येथून बेलापूर पनवेल येथे जाणाऱ्या बसेस तुम्हाला हाळ खुर्द गावाच्या स्टॉप ला सोडतील.

लेणीसंबंधीत संदर्भ :-

१.) सदर लेणीचा उल्लेख The Cave Temple of India, JFJB यामध्ये  पृष्ठ क्रमांक. २२२ वर केला असलेला संदर्भ भेटतो.त्याचबरोबर जेम्स फर्ग्युसन व जेम्स बर्जेस सदर लेणीत शिलालेख होता असे सुद्धा निदर्शन नोंदवतात.

२.) तसेच कुलाबा (आताचे रायगड) गॅझेटियर १९६४ मध्ये पृष्ठ क्रमांक. ८०८ वर सदर लेणीचे संदर्भ आहेत.

लेणीचे छायाचित्रे:-

१. लेणीची दर्शनी बाजू

२. उजव्या भिंतीतील दोन भिक्खूनिवास
३. समोरील भिंतीतील दोन भिक्खूनिवास

४. डाव्या भिंतीतील दोन भिक्खूनिवास

५. डाव्या भिंतीतील बाहेरील बाजूस असलेल्या भिक्खूनिवास येथील खिडकी व भग्न भिंत
६. लेणीत येण्याचा प्रवेशाचा मार्ग
७. लेणीशेजारी असलेलं कोरडे पाण्याचे टाके

८. लेणीच्या उजव्या भिंतीवर वातायान कोरण्याचा अथवा घडवण्याचा प्रयत्न झाला असावा

९. सहभागी सदस्य

धन्यवाद


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...